विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सायन्स एक्स्प्रेस अर्थात ‘विज्ञान राणी’ हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प आहे. येत्या १४ ते २२ जुलै या कालावधीत या विज्ञान राणीचा कोकणातून प्रवास होणार आहे. विज्ञानप्रसार करणारी ही सायन्स एक्स्प्रेस रत्नागिरी येथे १४ ते १७ जुलैदरम्यान, तर मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे १९ ते २२ जुलै या कालाावधीत थांबणार आहे. मात्र, रत्नागिरी ते मुंबई यादरम्यानच्या प्रवासात ही सायन्स एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात थांबणार नसल्याने रायगड जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार आहेत.रत्नागिरी आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी जाणे रायगडमधील विद्यार्थ्यांना कठीण आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातीलच आहेत, तर केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर हे रायगड जिल्ह्यामधील आहेत. निदान १८ जुलै रोजी रायगडमध्ये या सायन्स एक्स्प्रेसला थांबा द्यावा, अशी विनंती पेण कॉलेजचे प्राचार्य व विज्ञानतज्ज्ञ प्रा. डॉ. सदानंद भास्कर धारप यांनी केली. सायन्स एक्स्प्रेस रायगडमध्ये पेण येथे थांबवून, जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ही विज्ञानगंगा उपलब्ध करून देण्याकरिता आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना विनंती करणार असल्याचे आमदार जयंत पाटील म्हणाले.
‘विज्ञान राणी’चा रायगडला ठेंगा
By admin | Published: July 13, 2017 5:12 AM