शेफाली परब-पंडित, मुंबईआतापर्यंत फक्त चित्रपट किंवा वाहिन्यांवर पाहिलेले अफ्रिकेतील प्राणी, आॅस्ट्रेलियाचा कांगारू आणि विशेष आकर्षण ठरणारे पेग्विन मुंबईच्या बच्चेकंपनीला भायखळ्यातील राणीच्या बागेतच लवकर पाहायला मिळणार आहेत़ परंतु या प्राण्यांना बघण्यासाठी त्यांना चौपट प्रवेश शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे़ नाकापेक्षा मोतीच जड झाल्यामुळे एण्ट्री फी वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे़शाळेची सहल, सार्वजनिक सुट्टी व रविवारी कौटुंबिक गेट टू गेदरसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग हे ठरलेले ठिकाण़ मुलांचे अवघे २ रुपये व प्रौढांना केवळ ५ रुपयांमध्ये प्रवेश मिळत असल्याने बच्चेकंपनीची येथे गर्दी उसळत असते़ परंतु दररोज येणाऱ्या पर्यटकांचा आकडा मोठा असला तरी त्यातून जेमतेम ५० ते ६० लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने देखभालीचा खर्च राणीबागेला डोईजड झाला आहे़ देखभाली अभावी प्राण्यांची संख्याच कमी होऊ लागल्यामुळे ही बाग आता ओस पडू लागली आहे़ नूतनीकरणानंतर थायलंडचे प्राणिसंग्रहालयच येथे अवतरल्याचे भासेल, असा दावा महापालिकेमार्फत करण्यात येत आहे़ मात्र परदेशातून कोट्यवधींचे पशू-प्राणी आयात केल्यानंतर त्यांची नीट देखभाल ठेवणेही आव्हान ठरणार आहे़ त्यामुळे प्रवेश शुल्कात वाढ करून ही रक्कम उभी करण्याचा विचार सुरू असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून समजते़ यास परवानगी मिळाल्यास नूतनीकरणानंतर नवीन शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे़
राणीबागेची सहल महागणार!
By admin | Published: December 24, 2014 2:48 AM