मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राच्या एसएनएमआर (स्टोरेज नेटवर्क मॅनेजमेंट अॅण्ड रीट्रायवल) या विषयाची परीक्षा १४ मे रोजी घेण्यात आली होती. ८० गुणांच्या या पेपरमधील जवळपास ३० गुणांचे प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील होते, असा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. त्याच्या तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत विद्यापीठाने ३ विषय तज्ज्ञांकडून सूचना मागविल्या होत्या. तज्ज्ञांच्या अभ्यासावरून आणि शिफारशींवरून अखेर १० गुणांचा प्रश्न रद्द करण्यात आला असून, आता या पेपरचे मूल्यांकन ७० गुणांमध्ये करण्यात येईल. परंतु अंतिम गुण देताना त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने जारी केला आहे.
तज्ज्ञांकडून सुचविण्यात आलेल्या सूचनांनुसार, या पेपरमधील दोन प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत. यातील प्रश्न क्र. १ (बी) हा अनिवार्य आहे व प्रश्न क्र. ४ (ए) हा ऐच्छिक असून विद्यार्थी पाचपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न क्र. १ (बी) व प्रश्न क्र. ४ (ए) या दोन्हीही प्रश्नांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये नाही. हे दोन्हीही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत, असा निष्कर्ष विद्यापीठाने नियुक्त केलेल्या या ३ विषय तज्ज्ञांकडून विद्यापीठास प्राप्त झाला.
या निष्कर्षाच्या आधारे या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या (बोर्ड आॅफ स्टडीज) अध्यक्षांनी विद्यापीठास एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता यातील प्रश्न क्र. १ (बी) हा मूल्यांकनातून (पेपर तपासणीतून) रद्द करण्यात येईल. सदर प्रश्न हा १० गुणांचा आहे. यामुळे राहिलेल्या ७० गुणांचा पेपर तपासून गुण देताना मात्र त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करण्यात येईल. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एसएनएमआर विषयाचा पेपर देणारे हे सर्व विद्यार्थी शेवटच्या वर्षात शिकत आहेत. चुकीच्या प्रश्नांमुळे हे विद्यार्थी या विषयात नापास झाले तर त्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाईल. ज्या मुलांना महाविद्यालयाच्या प्लेसमेंटद्वारे नोकरी लागेल त्या विद्यार्थ्यांना नोकरीलादेखील मुकावे लागणार आहे. या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत आणि प्रश्नपत्रिका ज्या प्राध्यापकांनी काढली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले होते.विद्यार्थ्यांना फायदाविद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता यातील प्रश्न क्र. १ (बी) हा मूल्यांकनातून (पेपर तपासणीतून) रद्द करण्यात येणार आहे. रद्द करण्यात आलेला हा प्रश्न १० गुणांचा आहे. यामुळे राहिलेल्या ७० गुणांचा पेपर तपासण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना जेवढे गुण मिळतील त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करून अंतिम गुण देण्यात येतील. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.