राजानंद मोरेपुणे : रुग्णालयात जाऊन सुरक्षित प्रसुती करण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांत तब्बल १५ पटींनी वाढले आहे. मात्र, अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १० हजार प्रसुती जोखीम पत्करून रुग्णालयाबाहेर होत असल्याची स्थिती आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसुती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते.केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून घरगुती प्रसुतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्रांमार्फत गर्भवती महिला व त्यांच्या कुटूंबियांमध्ये जनजागृती केली जात आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर जाऊन गर्भवती महिलांची नोंद ठेवली जाते. त्यांना रुग्णालयांमध्ये तपासणीला येण्यासाठी आग्रह केला जातो. खासगी रुग्णालयांकडूनही गर्भवती महिलांची माहिती संकलित केली जाते. शहरी भागासह ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधा वाढत असल्याने घरगुती प्रसुतीचे प्रमाण प्रमाणावर कमी झाले आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, २०१०-११ या वर्षात महाराष्ट्रात घरगुती प्रसुतीचे प्रमाण सुमारे १ लाख ५९ हजार एवढे होते. त्यानंतर हे प्रमाण वेगाने कमी होत गेले आहे.वर्ष २०१२-१३ मध्ये घरगुती प्रसुतीचे प्रमाण पहिल्यांदाच एक लाखाच्या खाली आहे. यावर्षी सुमारे ६७ हजार महिलांची प्रसुती रुग्णालयाबाहेर झाली. मागील चार-पाच वर्षांमध्ये हा वेग पुन्हा मंदावल्याचे चित्र आहे. २०१९-२० मध्ये जानेवारी अखेरपर्यंत १३ लाख ८२ हजार महिलांनी रुग्णालयात प्रसुतीला पसंती दिली. तर घरगुती प्रसुतीचे प्रमाण ९ हजार ८६३ एवढे आहे. अजूनही ग्रामीण भागातील अनेक कुटूंबांमध्ये घरीच प्रसुती करण्यासाठी आग्रह केला जातो. काही ग्रामीण-आदीवासी भागामध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. काही वेळी प्रसुतीसाठी वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यात घरगुती प्रसुतीचे प्रमाण दहा हजाराच्या जवळपास आहे.
डॉ. कुंदन इंगळे, सचिव, पुणे ऑबस्टेट्रिक अॅन्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटी : शहरासह ग्रामीण भागातही चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने घरगुती प्रसुतीचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. पण सध्याचा आकडाही कमी नाही. आणखी खुप प्रयत्न करावे लागतील. प्रामुख्याने ग्रामीण-आदीवासी भागात ही समस्या आहे.