मी 'तो' व्हिडीओ संपूर्ण पाहिला, जितेंद्र आव्हाडांना विनंती करतो की...; अजितदादांनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:29 PM2022-11-14T12:29:23+5:302022-11-14T12:56:22+5:30
आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"मी जितेंद्र आव्हाडांना विनंती करतो की, त्यांनी राजीनामा देऊ नये. त्यांनी आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. प्रत्येक कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी तो व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे, यात जितेंद्र आव्हाड सर्वांना बाजूला करत आहेत. यात त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही, असंही अजित पवार म्हणाले.
सत्ता येत असते, सत्ता जात असते. कुणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सगळ झाले आहे, त्यांनीच असं काही झाले नसल्याचे सांगितले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल केला आहे, तो गुन्हा मागे घेतला पाहिजे.मी सरकारला विनंती करतो आमदार कोणत्या पक्षाचे आहेत तो विचार न करता चूक झाली असेलतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण, कारण नसताना लोकप्रतिनिधीला चुकीच्या पद्धतीने अपमानित करत असेल तर त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, असंही अजित पावर म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून अंजली दमानियांचे ट्विट
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जितेंद्र आव्हाड आणि हर हर महादेव शो बंद पाडण्याच्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले आहे. आज सकाळीच आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या नव्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, रस्ता अडविण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आता अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली आहे.
दमानिया काय म्हणाल्या...
विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.
विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 14, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा.
पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटले आहे.