BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसले असून यामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना मविआ नेत्यांकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून घ्यावं, असं आवाहन केलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांनी मी आवाहन केलं आहे की, तुम्हाला जर महाविकास आघाडीतील तीन पक्षांनाच मदत करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्यायला पाहिजे की सत्तेत आल्यास आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ. मविआतील पक्षांनी असं लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी त्यांना मदत करावी. कालच शेवटी शरद पवारांनी सांगितलं की जरांगेंची मागणी तर योग्य आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, पण इतरांचं कमी करू नका. म्हणजे शेवटी शरद पवारांची दुटप्पी भूमिका समोर आलीच. त्यामुळे आता आपल्यासमोर प्रश्न एवढाच आहे की या लोकांना एक्स्पोज केलं पाहिजे. हे जेवढे दुटप्पी भूमिका घेतात ते लोकांसमोर मांडलं पाहिजे," असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, "राज्य सरकारने जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तेव्हा स्वत: शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनावर सही केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, असं त्या निवेदनात म्हटलं आहे. शरद पवार आणि अन्य नेत्यांच्या सहीचा कागद आपल्याकडे आहे," असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.
मराठा आरक्षणावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय?
मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला असता रत्नागिरी इथं बोलताना नुकतंच शरद पवार म्हणाले की, "मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचं एक वैशिष्ट्ये होतं की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितलं तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे पाटील यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की धनगर, मुस्लीम, लिंगायत अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावं. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावं, असं आमचं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.