लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव(पूर्व) नागरी निवारा येथील बाराशे सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर सुटला आहे. राज्य सरकारने अलीकडेच याबाबत शासकीय आदेश काढत सदनिकाधारकांचा प्रश्न मार्गी लावला. नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला नागरी निवारा हा यशस्वी गृहनिर्माण प्रकल्प आहे. येथील बाराशेहून अधिक सदनिकांची खरेदी-विक्री झाली होती. मात्र, जाचक अटींमुळे येथील सदनिकांचे हस्तांतरण रखडले होते. विशेषत: जिथे मूळ सदनिकाधारकांनी विक्री केली. त्यानंतर स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे ते उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात मोठी अडचण निर्माण झाली होती. या प्रकरणी आमदार सुनील प्रभू यांनी कृती समितीला बरोबर घेऊन सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर विषय मांडला. शिवाय, विधानसभेत विविध आयुधं वापरून हा प्रश्न मांडला होता. या प्रश्नाविषयी नागरी निवारा पुनर्खरेदी सदनिकाधारक कृती समितीच्या वतीने खासदार गजानन कीर्तिकर, आमदार प्रभू, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, विधि समिती अध्यक्ष अॅड. सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. समितीच्या वतीने शैलेश पेडामकर, मनोहर जाधव, दिलीप कांबळी, गणपती राजगिरे, विजय साळसकर, संजय पालव, राजेंद्र खामकर, प्रवीण तेली, नीलेश मुणगेकर, नितीन मोहिते यांनी पाठपुरावा केला.
नागरी निवारातील सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न सुटला
By admin | Published: July 13, 2017 2:10 AM