ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - भ्रष्टाचाराप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर आता छगन भुजबळ यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रिती मेनन यांनी भुजबळ यांची पदवी बोगस असल्याची तक्रार चेंबूर पोलिसांकडे केली आहे. माझ्याकडे कोणतीही बोगस पदवी नसल्याचे सांगत भुजबळांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दिल्लीतील कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर, राज्यातील भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच्या पदवीवरुन वाद सुरु असतानाच आता छगन भुजबळ यांच्या पदवीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भुजबळ कुटुंबियांच्या एमईटी या संस्थेच्या संकेतस्थळावर भुजबळे हे मॅकेनिकल/इलेक्ट्रीक इंजिनियर असल्याचे म्हटले आहे. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एलएमई -१ या डिप्लोमामध्ये शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. भुजबळ यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रिती मेनन यांनी संशय व्यक्त केला असून या संदर्भात चेंबूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी असे मेनन यांनी म्हटले आहे. तर भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी व्हिजेटीआयमध्ये डिप्लोमा इन एलएमई या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. पण काही कारणास्तव मला हा डिप्लोमा अर्धवट सोडावा लागला. म्हणून मी डिप्लोमा इन एलएमई -१ असे लिहीतो असा दावा भुजबळ यांनी केला आहे. एमईटीच्या संकेतस्थळावर मी स्वतःहून कोणतीही माहिती दिली नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.