- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्य सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र, बळीराजा अडचणीत असतानाही सरकार मदत करत नसल्याने आम्ही आत्मक्लेश करून घेत आहोत. त्यासाठी २२ मेपासून पुण्यातून ‘आत्मक्लेश पदयात्रा’ काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अडचणींवर मात करत, शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून हमीभावाने तूर घेण्याऐवजी सरकार हात वर करत आहे. भाजीपाला, कांदा, फळे व इतर शेतमालालाही मातीमोल भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्याला मदत करण्याची, त्याच्यावरील कर्जाचा भार काढण्याची सरकारची भूमिका नाही. त्यामुळेच आमच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात सोमवारी सकाळी फुले वाडा येथून पदयात्रा सुरू होईल. नऊ दिवसांत ठिकठिकाणी मुक्कामाचे टप्पे ठरविले आहेत. २९ मे रोजी यात्रा मुंबईत आल्यानंतर, ३० मे रोजी राजभवनकडे प्रस्थान करण्यात येईल. शहरवासीयांनो सहभागी व्हा!नोकरदार वर्ग, प्राध्यापक, कलावंत, शहरी लोकांनी किमान एक दिवस यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजी-भाकरीची मदत यात्रेसाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. पाचशे, हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान्यापासून, कांदे-बटाटे, द्रोण-पत्रावळी अशी मदत दिली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी देण्याचे नियोजन केले आहे.