मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम आलेली थेट पंतप्रधान मोदींना पाठवल्यानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. कांद्याला प्रति क्विंटन 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस किलोमागे 1 ते 2 रुपयांचा भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा उत्पादकांचा वाढता रोष लक्षात घेता सरकारनं प्रति क्विंटल 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. 15 डिसेंबरपर्यंत कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम मिळेल. याशिवाय परराज्यातील कांद्यांच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे. कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कांदे उत्पादकांना बुरे दिन आले आहेत. कांद्याला किलोमागे फक्त 1 ते 2 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी रडकुंडीला आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नाशिकच्या निफाडमध्ये राहणाऱ्या संजय साठेंनी 750 किलो कांदा विकला. मात्र त्यातून त्यांना फक्त 1 हजार 64 रुपये मिळाले होते. साठेंनी त्यांची 'कमाई' पंतप्रधान मोदींना मनीऑर्डरनं पाठवली होती. यानंतर पीएमओनं या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
Onion Price: अखेर सरकारला जाग; राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 1:36 PM