अकोला : जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्सद्वारे राज्याच्या विविध भागात हवालाच्या माध्यमातून पाठविण्यात येत असलेली सुमारे २८ लाख रुपयांची रक्कम सोमवारी दुपारी जप्त करण्यात आली. या हवाला रॅकेटचा पर्दाफाश करताना स्थानिक गुन्हे शाखेने यासंदर्भात एका व्यावसायिकास ताब्यात घेतले आहे. या कुरिअर्सचे संचालक निमेश इंद्रवर्धन ठक्कर (४०) रा. नवरंग सोसायटी यांच्या कुरिअर्सच्या माध्यमातून हवाला रॅकेटची सुमारे २७ लाख ७९ हजार ३५० रुपयांची रोकड सोमवारी राज्याच्या विविध भागात पाठविण्यात येत होती. या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या पथकाने जुने कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्समध्ये छापा टाकून तब्बल २७ लाख ७९ हजार ३५० रुपयांची रोकड जप्त केली. यासोबतच ३० हजार रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, यामध्ये नोटा मोजण्याचे यंत्र, ४ महागडे मोबाईल, नोटांची पंचिग मशीन, ६ लॅन्डलाईन फोनचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली २८ लाख रुपयांची हवालाची रक्कम क्रिकेटवरील सट्टाबाजार, कमोडिटीज आणि अनधिकृत व्यवसायाची असल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली. या कुरिअर्समधून हवालाची रक्कम पाठविण्यात येणार असल्याची माहिती एका आठवड्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मागील आठवड्यापासून हे पथक आंगडिया कुरिअर्सवर पाळत ठेवून होते. सोमवारी रक्कम राज्याच्या विविध भागात पाठविण्याची तयारी सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ही रक्कम जप्त केली.
अकोल्यात हवाला रॅकेटचा पर्दाफाश
By admin | Published: May 13, 2014 4:07 AM