- अभिनय खोपडे / रवी रामगुंडेवार, गडचिरोली
नक्षली चळवळीमुळे संवेदनशील बनलेल्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे नक्षलवाद्यांचा प्रभावाखालील गाव आता कात काटत आहे. नक्षली चळवळीमुळे विकास खुंटल्याची जाणीव गावकऱ्यांना झाली अन् शेकडो लोक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी पुढे आले आहेत. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाकडे ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात एकट्या कोटमी गावातील २२ नक्षल सदस्यांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावरील कोटमी गावात कायम नक्षलवाद्यांचा वावर राहायचा. चकमकी, भूसुरूंग स्फोट व नक्षलवाद्यांकडून नागरिकांच्या हत्येच्या घटनांमुळे या भागात विकासाला कधीही गती मिळाली नाही. अनेक गावांपर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत. वीज नाही, आरोग्य, शाळेचा प्रश्न सुटला नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावातील काही शिक्षित तरुण त्या दिशेने कामालाही लागले होते. त्यातच १९ फेब्रुवारी २०१५ रोजी एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांतर्गत कसनसूर, जारावंडी, हालेवारा या तीन उपपोलीस ठाण्यांमध्ये समाविष्ट असलेली २२ गावे जोडण्यात आली. त्यात एटावाही, कोंदावाही, झुरी, सासावंडी या नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या मोठ्या गावांचाही समावेश होता. २० किमीच्या परिघातील गावे कोटमी पोलीस मदत केंद्राच्या क्षेत्रात देण्यात आली व पोलीस ठाणे झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक संजय भापकर यांच्याकडे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पोलीस प्रशासनाने भापकरांच्या नेतृत्वात या भागात शासनाचे अनेक उपक्रम सुरू केले. जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, नवजीवन अभियान, अग्नीपंख आदी उपक्रम लोकांपर्यंत नेण्यात आले. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना कंटाळलेल्या लोकांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा संकल्प केला. त्यातून एकट्या कोटमी पोलीस मदत केंद्रांतर्गत २२ नक्षल सदस्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. दोन नक्षलवाद्यांना अटकही करण्यात आली. पोलीस ठाण्याअंतर्गत चार चकमकीही झाल्या. मात्र कोटमीतील परिवर्तनाने नक्षल चळवळीला हादरा तर दिलाच, शिवाय दुर्गम भागात कायम नक्षल्यांच्या दहशतीत जगणाऱ्या शेकडो आदिवासी गावांमध्ये नवा पंचप्राण फुंकण्याचे काम झाले. ३५ किमी जंगलव्याप्त परिसरात पसरलेल्या कोटमी आणि रेगडी या दोन पोलीस मदत केंद्रांतर्गत पोलीस यंत्रणेला गेल्या वर्षभरात चांगले यश मिळाले. आत्मसमर्पण केलेल्या ५२पैकी २२ नक्षलवादी कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील आहेत. जिल्ह्यात ८४ गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे. - संदीप पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली