भाईंदर : भाजपाचे स्थानिक प्रवक्ते डॉ. सुरेश येवले यांनी प्रभाग क्र. ३२ मधील काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी हे इतर मागासवर्गीय नसल्याच्या दावा केला होता. त्यावर कोकण विभागीय जात पडताळणी समितीद्वारे घेण्यात आलेल्या सुनावणीनुसार त्यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता यावर पालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आॅगस्ट २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ३२ मधुन काँग्रेसचे फरीद कुरेशी हे विजयी ठरले. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या डॉ. सुरेश येवले यांना पराभूत केले. ही जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने कुरेशी यांनी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडून २३ जुलै २०१२ ला रीतसर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून ते निवडणूक प्रशासनाला सादर केले. त्यावर येवले यांनी आक्षेप घेत कुरेशी हे इतर मागास प्रवर्गातील नसल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर ३१ जानेवारी २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. एम. सोनक यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेवर दोन्ही बाजूंच्या दावेदारांनी फेब्रुवारी २०१४ ला कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. नव्याने घेण्यात येणाऱ्या सुनावणीवर पुढील ४ महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले होते. त्यानुसार समिती क्र. १ चे अध्यक्ष गौतम रसाळ, सदस्य राजेंद्र गोसावी व सदस्य सचिव सलीमा तडवी यांच्यापुढे १८ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी घेण्यात आली. त्यात याचिकाकर्ते येवले यांच्या बाजूने अॅड. चिंतामणी भनगोजी तर कुरेशी यांच्या बाजुने अॅड. माळी यांनी युक्तिवाद केला. १२ डिसेंबरला दिलेल्या आदेशात, इतर मागास प्रवर्गात दाखविलेली कुरेशी ही जात सिद्ध होत नसल्याचे नमूद करुन त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा निर्वाळा दिला. (प्रतिनिधी)