शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:58 AM2023-07-03T10:58:06+5:302023-07-03T10:59:04+5:30
अजित पवार राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेऊन सत्तेत सहभागी झाले
Rohit Patil on Maharashtra Political Crisis: सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराचा अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा नाही. सांगली जिल्ह्यात जेव्हा अजित पवार यांचा दौरा होता, तेव्हा त्यांचे धामधूमीत स्वागत झाले पण आता त्यांच्यासोबत इथला आमदार नाही. अजित पवार यांचे पक्षवाढीत योगदान आहे. पण आर आर पाटील आबांना एक सामान्य कार्यकर्त्यापासून ते गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत शरद पवार यांच्यात होती. ती संधी शरद पवार यांनी दिली. त्यामुळे शरद पवार अडचणीत असताना त्यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही साऱ्यांनी निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे मोठं काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल," असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
कराड येथे सोमवारी सकाळी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर येणाऱ्या शरद पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रोहित पवार व त्यांची समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते. रोहित पाटील म्हणाले ,राष्ट्रवादी हा वेगळा विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. आज अनेक जण या पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य माणूस मात्र नेहमीच शरद पवारांच्या विचारावर प्रेम करणाऱा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.