अकोला, दि. १८ : एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामासाठी शेतकर्यांनी कंबर कसली आहे. या अनुकूल स्थितीमुळे पश्चिम विदर्भात यावर्षी रब्बीची पेरणी नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत असून कृषी विभागाने यासाठीचे नियोजन केले आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे पश्चिम विदर्भात मागील वर्षी रब्बीची पेरणी घटली होती. तथापि २0१४ मध्ये मात्र ८ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी शेतकर्यांनी केली होती. सर्वाधिक पेरणी बुलडाणा जिल्हय़ात २ लाख ४३ हजार हेक्टरवर झाली होती. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७७ हजार हेक्टर, अमरावती १ लाख ५७ हजार हेक्टर, अकोला १ लाख ४१ हजार, तर वाशिम जिल्हय़ात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्यावेळी या पावसाने शेतकर्यांना दगा दिलाच होता. यावर्षी पुन्हा परतीच्या पावसाने शेतकर्यांना दिलासा दिल्याने रब्बी हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. पश्चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यंदा पश्चिम विदर्भातील काही धरणांमध्ये बर्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
****
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढेल. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हरभर्यासह गहू पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.
- एस.आर. सरदार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.