डोंबिवली : डोंबिवलीचे भाजपा आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे केवळ राजकारणी नाहीत तर ते ‘डोंबिवलीकर’ नावाचे दर्जेदार मासिकाचे संपादक आहेत. त्यांची डोंबिवलीतील साहित्य वर्तुळाशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचे स्वागाध्यक्षपद चव्हाण यांनाच देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डोंबिवली शाखाध्यक्ष वामनराव देशपांडे यांनी केली आहे. डोंबिवलीत ज्येष्ठ नागरीकांचा सन्मानासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशपांडे यांनी ही मागणी केली. संमेलन डोंबिवलीत होण्याची घोषणा होताच मसापने आगरी यूथ फोरमचा सत्कार केला. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच मसापचे शहर शाखाध्यक्ष देशपांडे यांनी चव्हाण यांना स्वागाताध्यक्षपद देण्याची मागणी केली आहे. देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही मागणी मसापची नसून हे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले.मसापचे डोंबिवली शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मसापचा हा विषय नाही. यजमान संस्था आगरी यूथ फोरम असल्याने स्वागताध्यक्षपद हे गुलाब वझे यांनाच मिळणार.
रवींद्र चव्हाण संमेलनाचे स्वागताध्यक्ष ?
By admin | Published: October 04, 2016 2:28 AM