मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत असले, तरी सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे ९ डिसेंबरपर्यंत शासनाने भूमिका जाहीर केली नाही, तर राज्यात ‘बोलके मोर्चे’ निघतील, असा इशारा ‘मराठा आरक्षण समन्वय’ समितीने दिला आहे. मात्र, समन्वय समितीशी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे-पााटील यांनी दिले आहे.या आधी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत, मराठा आरक्षण समन्वय समितीने शासनाला ९ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्यात समितीने सांगितले की, शासनाने ९ डिसेंबरपर्यंत भूमिका जाहीर करावी. नाहीतर ९ डिसेंबरला मराठा समाजबांधव सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान बैलगाडी आणि पशुधनासह रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर, राज्यात मराठा समाजाचे ‘बोलके मोर्चे’ निघतील. या आंदोलनात समन्वय समितीसोबत राज्यातील ४३ मराठा संघटनांचा समावेश असल्याचा दावाही केला आहे. मात्र, मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनात सामील होणार नसल्याचे रवींद्र काळे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले की, ‘मराठा क्रांती मूक मोर्चाने नागपूर अधिवेशनावर १४ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या महामोर्चाच्या तयारीसाठी १८ नोव्हेंबरला अमरावती येथे मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार आहे. इतर मोर्चांप्रमाणेच हा महामोर्चाची मूक असेल,’ असेही काळे पाटील यांनी सांगितले. मात्र, त्या आधी कोणताही ‘रास्ता रोको’ किंवा ‘बोलके मोर्चे’ काढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रास्ता रोको’शी संबंध नाही!- रवींद्र पाटील
By admin | Published: November 17, 2016 4:04 AM