ऑनलाइन लोकमत
सातारा, दि, 22 - 'राज्यातील बैल गाड्यांची शर्यत सुरु करावी,' या मागणीसाठी सांगली येथील शेतकरी विजय जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालायासमोरील तिरंग्याच्या ध्वज स्तंभावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे सरकारी कार्यालयात खळबळ उडाली. फोनाफोनी करून पोलिसांना घटनास्थळी बोलाविण्यात आले.
पोलिसांनी त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून देतो, अशी समजूत घातली. त्यानंतर सुमारे दीड तासांनी जाधव खाली उतरले. मात्र तरीही त्यांनी आंदोलन सुरुच ठेवत सोबत आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केलाच. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
जाधव हे बुधवारी सांगलीवरून साताऱ्यात आले होते. आंदोलन करताना 'माझे चार भाऊ पोलिस खात्यामध्ये आहेत. माझे भांडण पोलिसांसोबत नाही,' असे ते ओरडून सांगत होते. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
https://www.dailymotion.com/video/x844ul0