मुंबई : रेल्वेच्या विभागीय परीक्षेसाठी कनिष्ठ अभियंत्याकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना पश्चिम रेल्वेच्या दोन वरिष्ठ विभागीय अभियंत्यांना सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप टी. खैरे आणि शकिंद्रा एस. लोखंडे अशी लाचखोरांची नावे असून, ते महालक्ष्मी कार्यशाळेत काम करत होते.खैरे आणि लोखंडे यांनी येथील कनिष्ठ अभियंत्याला विभागीय परीक्षेत मदत करून, एलडीसी विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पाच लाखांची मागणी केली. विभागीय परीक्षा समितीशी दोघांचा काही संबंध नाही आहे. विभागीय परीक्षांमध्ये गोंधळ असल्याच्या संशयातून नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेली भरती, तसेच पदोन्नती परीक्षेची कागदपत्रे सीबीआयने जप्त केली होती. अशात पाच लाखांची मागणी करण्यात येत असल्याचे समजताच, शनिवारी सीबीआयने पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी कार्यशाळेत सापळा रचला. पाच लाखांचा चेक स्वीकारताना दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. प. रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही सेवेतूनही निलंबित केले, तसेच दोघे यापूर्वीही रडारवर होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याने कारवाई करणे शक्य झाले नाही. (प्रतिनिधी)
रेल्वेच्या लाचखोर अभियंत्यांना अटक
By admin | Published: February 01, 2017 2:07 AM