ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २८ - ठाण्यातील चेक मेट प्रायव्हेट सर्विसेसच्या कार्यालयावर मंगळवारी पहाटे अज्ञात आरोपींनी दरोडा टाकून कोटयावधींची रोकड लुटली. विविध ग्राहकांकडून पैसे गोळा करुन ते बँकांमध्ये जमा करण्याचे काम ही कंपनी करत होती. ठाण्यात तीन हात नाका परिसरातील मनोरुग्णालयासमोरील हिरादीप सोसायटीत चेकमेट कंपनीचे कार्यालय आहे.
पहाटेच्या सुमारास सात ते आठ आरोपींनी चाकू, बंदुकीचा धाक दाखवून ११ कोटी करोड रुपयांची रोकड लुटली. यावेळी कंपनीच्या कार्यालयात एकूण २६ कोटीची रोकड होती. ऑनलाइन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवार असे दोन सुट्टीचे दिवस असल्याने जास्त रोकड होती. दररोज या कंपनीत १४ ते १५ कोटींची रोकड जमा व्हायची. मॉल्स, ज्वेलर्स, गारमेंट व्यावसायिक या कंपनीचे कस्टमर आहे. या व्यावसायिकांकडून रोकड गोळा करुन बँकेत जमा करण्याचे काम ही कंपनी करायची. एकूण सहा बँकांमध्ये ही कंपनी पैसे भरायची.
ठाणे पोलिसांनी या दरोडया प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. इतक्या सूसूत्रपद्धतीने दरोडा टाकल्याने कंपनीच्या अधिका-याने माजी कर्मचा-यावर संशय व्यक्त केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.