ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 - पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून केवळ वर्षभरापूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष उफाळून आला. शुक्रवारी सकाळी खोपट येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. या हाणामारीमध्ये एक कार्यकर्ता जखमीदेखील झाला आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये तिकीट देण्यावरुन ही वादाची ठिणगी पडली असून स्थानिक उमेदवारांचा विचार न झाल्यास या प्रभागातील 1 हजारांपेक्षा अधिक कुटुंबे भाजपाविरोधात मतदान करतील असा इशारा या प्रभागातील महिलांनी दिला आहे.
संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आतापर्यंत कोणत्याच पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली नव्हती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र सर्वच पक्षामध्ये बंडखोरीला सुरुवात झाली असून यामध्ये भाजपामध्ये पहिल्यांदा कार्यकर्त्यानी पक्षाच्या विरोधात उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपचे पदाधिकारी सचिन सावंत यांना तिकीट मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. यासाठी गुरुवारी रात्रीपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने खोपट येथील पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित होते.
मात्र सचिन सावंत स्थानिक असतानाही वर्षभरापूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्या आणि बाजूच्या प्रभागामध्ये असलेल्या अंकुश हिंगावले यांना तिकीट दिल्यामुळे या प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये रोष उफाळून आला. पैशाच्या जोरावर स्थानिकांना डावलून तिकीट दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयामध्येच मोठा गोंधळ घातला. यामध्ये एक कार्यकर्ता देखील जखमी झाला आहे.
तिकीट मिळावे म्हणून सर्वच पक्षामध्ये कार्यकर्ते इच्छुक असतात. सचिन सावंत पदाधिकारी असून हा वाद एवढा मोठा नसल्याचे सांगत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची सावरासावर केली आहे.
घाडीगांवकर यांच्या दबावामुळे तिकीट वाटप
संजय घाडीगांवकर यांच्या दबावामुळे हा सर्व प्रकार झाला असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. संजय घाडीगांवकर यांच्या विरोधातही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाहेरून आलेल्या एका नगरसेवकाच्या दबावामुळे जर अशा प्रकारे तिकीट दिले जात असेल तर भाजपवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पैसे घेऊन उमेदवारी ?
भाजपामध्ये सुरुवातीपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर नसून पैसे घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप देखील महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. पैसे देऊनच जर उमेदवारी देणार असाल तर वेळ पडली तर आमचे दागिने देखील विकू अशा तीव्र भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.