मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागातील अभ्युदयनगर वसाहतीच्या एकत्रित पुनर्विकासाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला असताना तिथे एका विशिष्ट बिल्डरसाठी काम करणाऱ्या अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाला (महासंघाला ) स्थानिक रहिवाशांनी एकजूट दाखवून शनिवारी रात्री चांगलाच दणका दिला. विशेष म्हणजे, पोलिसांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. मात्र संतप्त रहिवाशांनी, विशेषत: महिलांनी कुणालाही न जुमानता आपला संताप व्यक्त केलाच.मुंबईतील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून अभ्युदयनगरचा पुनर्विकास प्रकल्प सध्या चर्चेत आहे. ४७ गृहनिर्माण संस्थांच्या या वसाहतीमधील २९ सोसायट्यांमध्ये विकासक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १८ सोसायट्यांची निवड प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तरीही तेथील अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाने (महासंघाने) ४७ सोसायट्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) न घेता बेकायदेशीररित्या रूस्तमजी बिल्डरच्या मे.किस्टोन रियल्टर्सला अंतिम विकासक म्हणून पत्रही देऊन टाकलं. किस्टोन रियल्टर्सच्या सुधारीत पुनर्विकास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ललित कला भवनमध्ये विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले होतं. या सभेत प्रत्येक सोसायटीच्या फक्त चारच सदस्यांना प्रवेश दिला जात होता. अभ्युदयनगरचा पुनर्विकासाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असताना आपल्यालाही सभेमध्ये प्रवेश मिळावा अशी इच्छा अनेक रहिवाशांची होती. परंतू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दडपशाहीचा वापर करत त्यांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला. अखेर संतापाचा उद्रेक झालेल्या रहिवाशांनी सभागृहाबाहेर महासंघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसी बळाचा वापर करत रहिवाशांना रोखण्याचा प्रयत्नही केला. वसाहतीमधील महिलांनी महासंघाचे सारे मनसुबे उधळून लावले. थेट सभागृहात प्रवेश करून सभेला सुरूवात करण्याची मागणी केली.यामुळे महासंघाचे भेदरलेले अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी सभा सुरू होण्याआधीच बेकायदेशीररित्या ती संपल्याचं जाहीर केले. त्यामुळे सभागृहातील लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. महिलांनी घोषणा देत सगळा परिसर दणाणून सोडला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दबावाचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजावत नव्हतं. परंतु या महासंघाच्या एकाधिकारशाहीमुळे रहिवाशांच्या सहनशिलतेचा अंतच झाला.>फेरी काढून स्वयंस्फूर्त आंदोलनसभागृहाबाहेर येऊन मुसळधार पावसात रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे अभ्युदयनगरच्या रस्त्यांवर, गल्लोगल्लीत फेरी काढत महासंघाच्या निषेधाच्या घोषणा देत अभ्युदयनगर दणाणून सोडलं. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासाबाबत काही बोलण्यास न धजावणारे रहिवाशीही स्वयंस्फुतीर्ने या आंदोलनात रस्त्यावर उतरले. समर्थ अभ्युदयनगर रहिवाशी सेवा संघाच्या नव्या नेतृत्त्वाखाली आता अभ्युदयनगरचा कायदेशीर पुनर्विकास करण्याचा निर्धार रहिवाशांनी यावेळी केला. यावेळी श्री समर्थ अभ्युदयनगर रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल अंकोला आणि सचिव तुकाराम रासम म्हणाले, हा लोकांच्या एकजुटीचा विजय आहे. त्यांच्या रागाचा हा उद्रेक म्हणावा लागेल.
महासंघाविरोधात रहिवाशांचा राडा!
By admin | Published: September 19, 2016 1:57 AM