ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीत स्वयंपाकी म्हणून काम करणा-या दोघा तरुणांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यातील एकाने सहका-यावर चाकूने वार केले असून या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनेत सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी होत्या का याचा तपास सुरु केला आहे.
वांद्रे येथील कलानगर परिसरात मातोश्री हा बंगला असून या तीन मजली इमारतीचा पहिला मजला सध्या बंद आहे. दुस-या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य होते. पण त्यांच्या निधनानंतर या मजल्याचा फारसा वापर केला जात नाही. तर तिस-या मजल्यावर उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह राहतात. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री मातोश्रीतल स्वयंपाकी म्हणून काम करणारे सेवक व पंडित हे दोघे थट्टामस्करी करत होते. मात्र यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला व संतापाच्या भरात सेवकने पंडितवर चाकूने हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मंदा या मोलकरणीवरही सेवकने चाकूने वार केले. याघटनेत दोघे जखमी झाले असले तरी सध्या त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे डीसीपी विरेंद्र मिश्रा यांनी मुंबई मिररला सांगितले. पोलिसांनी सेवकला अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. सेवक व पंडित हे दोघेही मुळचे नेपाळचे आहेत.
दरम्यान, या घटनेने मातोश्रीतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंगल्याच्या आतमधील सुरक्षेत पोलिसांचा फारसा प्रश्न नाही. पण आता वरिष्ठ अधिका-यांनी ठाकरे कुटुंबाशी चर्चा करुन यावर तोडगा काढायला हवा असे एका अधिका-याने सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवाद्यांपासून धोका असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर मातोश्रीवर सुरक्षेत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. सध्या उद्धव ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.