पुणे : पुरोगामी विचाराच्या विद्यार्थी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत त्यांच्या गाडीवर दगडफेकही केली. यावेळी विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. देशविरोधी घोषणा देणाऱ्या पुरोगामी विचाराच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, असे पत्र डेक्कन पोलिसांना लिहून नंतर घूमजाव करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली. फर्ग्युसनमध्ये अभाविपच्या वतीने मंगळवारी ‘जेएनयू का सच’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमाला अभाविपच्या जेएनयू शाखेचा अध्यक्ष अलोक सिंह उपस्थिती राहणार होता. परवानगी नसताना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद निर्माण झाल्यामुळे काही वेळ फर्ग्युसन महाविद्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे प्रकरण निवळल्यानंतर प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, असे पत्र डेक्कन पोलिसांना दिले होते. मात्र, या पत्रावरून गदारोळ उठल्यावर ‘राष्ट्रविरोधी’ हा शब्द अनवधानाने राहिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. ही टायपिंग मिस्टेक असल्याचे सांगत त्यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेले विद्यार्थी आक्र मक झाले होते. त्यातच आज आव्हाड फर्ग्युसनमध्ये आले. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांना धक्काबुक्कीही झाली. यावेळी अभाविप, भाजयुमो आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करताना रिव्हॉल्वर बाहेर काढताच कार्यकर्ते पांगले. आव्हाडांना रस्ता मोकळा करून दिला.फर्ग्युसनचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी डेक्कन पोलिसांना देशविरोधी घोषणा दिल्याचे पत्र देऊन काही तास उलटत नाहीत तोच यू टर्न घेतला. टायपिंग मिस्टेक असल्याचे स्पष्टीकरण देत पत्रातील ‘देशविरोधी’ शब्द त्यांनी मागे घेतला आणि ‘घोषणा दिल्या असल्यास’ असे हवे होते, असे त्यांनी सांगितले. जेएनयू प्रकरण ताजे असताना फर्ग्युसनमध्ये असा प्रकार घडल्याचे समजताच राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र, असे काही घडले असेल याला सबळ पुरावा नसल्यामुळे प्राचार्यांनी घूमजाव केले. त्यांनी पुन्हा दुसरे पत्र पोलिसांना देऊन आधीचे पत्र मागे घेत असल्याचे कळवले.