ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर आधारित हे राम नथुराम या नाटकामुळे रविवारी रात्री नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व संभाजी ब्रिगेडने या नाटकाचा जोरदार विरोध करत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहासमोर आंदोलन केले. तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे नाटकाच्या संरक्षकाची भुमिका घेण्यात आल्याचचे चित्र दिसून आले.
हे राम नथुराम या नाटकाला औरंगाबादेत शनिवारी विरोध करण्यात आला होता. शनिवारी रात्री ९ वाजता या नाटकाचा प्रयोग देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही, अशी भुमिका कॉंग्रेस, राष्ट्रवादीने अगोदरच जाहीर केली होती. त्यामुळे सभागृहाच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रात्री ८ वाजल्यापासूनच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते धडकले. त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेदेखील पोहोचले व त्यांनीदेखील विरोध सुरू केला. अभिजीत वंजारी, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार हेदेखील आंदोलकांमध्ये सहभागी होते.
सभागृहाच्या दुसऱ्या दारावर सलिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रवेशद्वारावर चढून आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. सुमारे दीड तास तिन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाटकाला संरक्षण पुरविले होते. कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृह परिसरात वादावादीदेखील झाली.हा निवडणूकांसाठीचा स्टंट : शरद पोंक्षेदरम्यान, या नाटकाचे दिग्दर्शक व अभिनेते शरद पोंक्षे यांनी विरोध करणाऱ्यांवर टीका केली. या अगोदर नागपुरात मी नथुराम गोडसे बोलतोयह्णचे प्रयोग झाले. त्यावेळी कुणी विरोध केला नाही. आता निवडणूका तोंडावर असल्याने हा स्टंट सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. या नाटकाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले असून यातून कुणाचेही उदात्तीकरण करण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चढाओढमनपा निवडणूकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर वेगवेगळे स्थान पकडून विरोध केला. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुणाचा जोर मोठा अशी चढाओढ दिसून आली. दुसरीकडे कॉंग्रेसमध्येदेखील २ विचारप्रवाह दिसून आले. शहराध्यक्षांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ह्यनाटक होऊ देणार नाहीह्ण असा आक्रमक पवित्रा घेतला होता. तर त्याचवेळी गांधीवादी परिवाराच्या माध्यमातून तेथे पत्रक वाटण्यात आले. यात गोंधळ घालणे हा आमचा प्रांत नाही. आमचा विरोध वैचारिक असणे आम्हास बंधनकारक आहे, अशी भुमिका नमूद होती. या पत्रकावर कॉंग्रेसच्या काही नेत्यांची नावे होती हे विशेष.