औरंगाबाद, दि. 1 : अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली.
बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव परित होऊन आज १० दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी सभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली. भाजपातर्फे राधाकिसन पठाडे यांनी तर काँग्रेसतर्फे राहूल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. अखेर ‘हात’ वरती करुन मतदान घेण्यात आले. यावेळी पठाडे यांना १३ मते पडली. काँग्रेसचे सावंत यांना ४ मते पडली व अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ रहाणे पसंत केले.
दुपारी २.३० वाजता सहनिबंधक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) यांनी राधाकिसन पठाडे विजयी झाल्याचे जाहीर केले. आणि बाजारसमितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतशबाजी आणि डिजे लावून या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्तांनी आणलेला गुलाबाचा जेम्बो हार यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, नगरसेवक राजू शिंदे यांच्या गळ्यात घालण्यात आला.
आता बाजारसमितीमधील सभापती व उपसभापती दोन्ही प्रमुखपद भाजपाकडे आले आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या मतदार संघातील बाजार समितीवर वर्चस्वस्थापन करण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. मात्र, यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला हे मात्र, तेवढेच खरे. भाजपाचे ७ संचालक ज्यात भागचंद ठोंबरे, रघुनाथ काळे, गणेश दहिहंडे, दामोधर नवपुते, राम शेळके, अल्काबाई दहिहंडे, संगिता मदगे तसेच काँग्रेसमधून भाजपात आलेले ३ संचालक राधाकिसन पठाडे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, २ व्यापारी संचालक प्रशांत सोकीया, हरीशंकर दायमा व १ हमालमापाडी संचालक देवीदास किर्तीशाही असे १३ जण होते. तर काँग्रेसचे संजय औताडे, नारायण मते, दत्तु तारो, राहूल सावंत हे चौघे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले.