Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:23 IST2018-08-22T16:23:04+5:302018-08-22T16:23:43+5:30
Gurudas Kamat Death: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली
मुंबई - काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
कामत यांच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. गुरूदास कामत यांचा संघटनात्मक अनुभव दांडगा होता. कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ होते. त्यांची नाळ थेट सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली असल्याने ते एक लोकप्रिय नेते होते व त्यामुळेच तब्बल पाच वेळा त्यांना लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारमध्ये अनेक खात्यांचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाला अधिक संघटनात्मक बळकटी दिली. सध्याच्या संघर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आणि उत्तम संघटन कौशल्याची अतिशय गरज होती.
परंतु, त्यांनीअचानक ‘एक्झिट’ घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. कामत यांच्या निधनामुळे वैयक्तिक देखील मोठी हानी झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्या काळापासून कामत यांनी सातत्याने आपल्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांची पोकळी प्रकर्षाने जाणवत राहिल, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या व दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.