नाशिक- राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करता येत्या एक एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर बदलणार नसून ते आता १ मे किंवा शासन निर्धारित करेल त्या तारखेपासून बदलतील असे आदेश नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी सोमवारी (दि.३०) जारी केले आहेत.
जमिनीचे सरकारी बाजार मूल्य किंवा रेडीरेकनरचे दर हे सर्व प्रकारच्या जमीन आणि घरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आधारभूत असतात. शासनाचे मुद्रांक शुल्क भरताना जमिनीचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) प्रमाणेच हेच आधारभूत असतात.
काही वर्षांपूर्वी १ जानेवारीपासून दरांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून १ एप्रिलपासून हे दर बदलले जातात. यंदा जीपीएस मॅपिंगद्वारे जमिनीचे मूल्य निर्धारण करण्यात येणार होते. त्यादृष्टीने शासनाने तयारी केली होती. दरम्यान, गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यातील वातावरण बदलले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच टक्के शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज करण्याचे आदेश आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 1 एप्रिल पासून हे दर बदलणार नसून त्याऐवजी 1 मे पासून दरात सुधारणा केली जाणार आहे.
तोपर्यंत जमिनीचे व्यवहार झाल्यास त्यासाठी गेल्या वर्षाचे दर आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे विकासक आणि सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या स्थितीमुळे सर्वत्र लॉक डाऊन असून उद्योग- व्यवसाय आणि आणि सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना बंद आहेत. बांधकाम क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. अशा वेळी शासनाने दरामध्ये सुधारणा करताना सहानुभूतीपूर्वक विचार करावा किंबहुना दरवाढ करू नये अशी मागणी विकासकांकडून होत आहे.