आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १९ : राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा (२0१६-१७) राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्हा आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शाहू जयंतीदिनी म्हणजे सोमवार दि. २६ जून रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३ मध्ये गोवा राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (सीएसआयआर) या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.वैज्ञानिक क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीपूर्ण वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणून यावर्षीचा हा पुरस्कार माशेलकर यांना दिला जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा यंदाचा हा ३२ वा पुरस्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. १९८४ पासून आजपर्यंत ३१ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.यापूर्वी भाई माधवराव बागल, डॉ. व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे, रयत शिक्षण संस्था, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रा. शिवाजीराव भोसले, आशा भोसले, प्रा. पी. बी. पाटील, शरद पवार आदी मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
फेलो, रॉयल सोसायटी.
निदेशक, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (सीएसआयआर).
पद्मश्री.
पद्मभूषण.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१३)