विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली. या योजनेमार्फत महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनीही राज्य सरकावर निशाणा साधला आहे. "सरकारची ही योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, असा टोला रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे.
Mihir Shah : मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अखेर शहापूरमधून केली अटक
आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "लाडकी बहीण योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी ही सरकारची योजना आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी सरकारवर केली. सरकारने जाहीर केलेली योजना राजकीय उद्देशाने जाहीर केली आहे. ही योजना फसवी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. पण महिलांना एवढे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे कुठे?, असंही रघुनाथदादा पाटील म्हणाले.
अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. एकाचवेळी अनेक महिला अर्ज भरण्यासाठी जात असल्याने जागोजागी रांगा लागत आहेत. मात्र आता सरकारने या योजनेसाठी अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. पात्र महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे. या योजनेतून पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून या माध्यमातून एका वर्षात १८ हजार रुपये मिळतील, यामध्ये ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्याचेही पैसे दिले जातील.
उत्पन्न मर्यादा काय-
१) अडीच लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला.
२) अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक.
कोण अर्ज करू शकते-
राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि परित्यक्त्ता स्त्रिया अर्ज करू शकतात. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला अर्ज करता येईल.