मुंबई : भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांनी या आयोगाला अध्यक्षपद मिळाले आहे. आयोगावर इतर सहा सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आहे. विभागनिहाय सदस्यांची नावे अशी, नीता ठाकरे - नागपूर, शोभा वैजीनाथ बेंझर्गे - लातूर, गयाताई कराड - बीड, वृंदा किर्तीकर - मुंबई, देवयानी ठाकरे - जळगाव आणि अॅड. अशाताई लांडगे - मुंबई. महिला व बालकल्याण विभागाने या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या की महिला आयोगाला अध्यक्षपद नाही, अशा बातम्या कायम येत होत्या. महिलांशी संबंधीत कोणत्याही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना कायम हा प्रश्न त्यांना विचारला जात असे. आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या रहाटकर या औरंगाबादच्या माजी महापौर असून भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत.युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नाही. तरीदेखील विविध विभागाचे जीआर, अधिसूचना ‘त्यां’ना पाठविल्या जातात. महिला आयोगाच्या संदर्भात महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांच्या सहीने काढण्यात आलेल्या या अधिसूचनेची प्रती देखील उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे. आता राज्यात उपमुख्यमंत्री कोण आहेत? व ही प्रत कोणाला द्यायची,असा प्रश्न ही अधिसूचना वाटप करणाऱ्या शिपायाला पडला होता!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रहाटकर
By admin | Published: February 11, 2016 1:39 AM