मुंबई - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच पूर्णविराम मिळाला. राहुल यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला नसल्याची चर्चा मतदार संघात रंगली असताना राहुल यांना काँग्रेसकडून चिखली मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत भाजपच्या श्वेता महाले यांच्याशी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत सामील झाले. यापैकी सर्वाधिक नेते भाजपमध्येच दाखल झाले. भाजपमधील भरती आतापर्यंत सुरू आहे. तर काही नेते वेटींगवर आहेत. वेटींगवर असलेल्या आमदारांमध्ये राहुल बोंद्रे यांचे नाव होते. बोंद्रे भाजपमध्ये जावून चिखलीतून उमेदवार असतील, अशी चर्चा होती. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत चिखलीची उमेदवारी श्वेता महाले यांना देण्यात आली आहे.
राहुल बोंद्रे भाजपमध्ये गेले नाहीच. परंतु, केवळ चर्चेमुळे त्यांची काँग्रेसची उमेदवारीही हातची गेली की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. तर राहुल यांनी देखील आपण भाजप प्रवेश करणार या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. तसेच काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सांगेल त्यांचा आपण प्रचार करणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले होते. आपण काँग्रेससोबत असल्याची त्यांनी पुष्टी दिली होती. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत राहुल बोंद्रे यांची उमेदवारी निश्चित कऱण्यात आली.