मुंबई - काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघातून भाजपने श्वेता महाले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बोंद्रे यांना भाजपमध्ये घेतलेच नसल्याची चर्चा चिखलीत सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत सामील झाले आहेत. यापैकी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मेगा भरती झाली. ती भरती आतापर्यंत सुरू आहे. तर काही नेते वेटींगवर आहेत. यामध्ये चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव होते. बोंद्रे भाजपमध्ये जावून चिखलीतून उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. परंतु, आज भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत चिखलीची उमेदवारी श्वेता महाले यांना देण्यात आली आहे.
एकंदरीत राहुल बोंद्रे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला नाहीच, परंतु, या भानगडीत काँग्रेसची उमेदवारीही हातची गेली की काय अशी स्थिती आहे. तर श्वेता महाले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान आपण काँग्रेससोबत असल्याचे राहुल बोंद्रे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बोंद्रे यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.