शेगाव:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज (17 नोव्हेंबर, गुरुवार) 11 वा दिवस आहे. दुपारी एक वाजता त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याचा पुनरुच्चार केला. राहुल गांधी म्हणाले, 'माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे, जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते. त्यात त्यांनी इंग्रजांना सेवक होण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि मोहन भागवत यांनी हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती,' असा दावा राहुल गांधी यांनी केला.
संबंधित बातमी- अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी
सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आणि त्यांच्याकडून पेन्शन घेतली, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. विशेष म्हणजे, कालच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या विचारांना जमिनीखाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली होती. यावर राहुल गांधी म्हणाले की, हिम्मत असेल तर आमची यात्रा थांबवून दाखवा.
'गांधी, नेहरू, पटेल झुकले नाहीत'पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, अशा पत्रावर कोणीही सही केली नव्हती,' असंही राहुल म्हणाले. तसेच, 'या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर यात्रा थांबवून दाखवावी. आमच्या राजकारणात आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे, आम्ही हुकूमशाही मानत नाही,' अशी टीकाही राहुल यांनी केली.
'भाजप हुकूमशाही पद्धतीने काम करेत'राहुल पुढे म्हणाले की, 'आम्ही भारत जोडो यात्रा कोणत्याही स्वार्थासाठी करत नाही आहोत. आम्ही सप्टेंबरमध्ये हा प्रवास सुरू केला, या प्रवासात आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर जाणार आहोत. यामागे आमचा निवडणूक जिंकण्याचा किंवा इतर काही हेतू नाही. भाजपचे राजकारण द्वेष, भीती आणि हिंसेने भरलेले आहे. याविरोधात आमची भारत जोडो यात्रा आहे. या यात्रेची गरज नसती, तर लाखो लोक यात्रेत सहभागी झाले नसते,' असंही राहुल म्हणाले.