राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच तासांत उभं राहतं अख्खं गाव! ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची केली सोय
By श्रीनिवास भोसले | Published: November 8, 2022 07:06 AM2022-11-08T07:06:45+5:302022-11-08T07:07:16+5:30
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे.
देगलूर (जि.नांदेड) :
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. ही पदयात्रा सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल झाली. या दीडशे दिवसांच्या पदयात्रेतून खासदार राहुल गांधी हे एका वातानुकूलित कंटेनरमध्ये मुक्कामी राहतात. त्यांच्या या ताफ्यात असलेल्या जवळपास ६० ते ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे.
सामान्य लोकांना जोडण्यासाठीचा मार्ग म्हणून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. दिवसभर २२ ते २५ किलोमीटरचे अंतर पायी चालून राहुल गांधी त्यांच्यातील जोश आणि उत्साह कायम कसा ठेवतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यांच्या या स्पिरीटचे अनेकांकडून कौतुकही होत आहे. राहुल गांधी हे मुक्काम कुठे करतात, याबाबतही अनेकांना उत्सुकता लागली आहे.
राहुल गांधी यांच्यासह सोबत असलेल्या जवळपास २३० लोकांची कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल ६० ते ६२ कंटेनर असून, त्यातील एक नंबरच्या कंटेनरमध्ये राहुल गांधी हे मुक्कामी असतात. काही डब्यांमध्ये स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनरही बसविले आहेत. प्रवासादरम्यान, तापमान आणि वातावरणात होणारा बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या रूममध्ये बेडसह बरंच काही...
राहुल गांधी ज्या कंटेनरमध्ये मुक्कामी राहणार आहेत, त्यामध्ये बेडसह फ्रीज, एक सोफा, समोर टीपॉय, टॉयलेट, बाथरूम, एसी, फॅन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रूमच्या एका बाजूने महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचे छायाचित्र दर्शनीभागात फ्रेम करून लावलेले आहे.
कंटेनरमध्ये मुक्काम
भारत जोडो पदयात्रेत असलेले जवळपास ६० ते ६२ कंटेनर एकाच ठिकाणी थांबतात. त्यात राहुल गांधी ज्यामध्ये मुक्काम करतात, त्या कंटेनरच्या समोरच सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. रात्रीच्या विश्रांतीसाठी हे कंटेनर दररोज नवीन ठिकाणी एका गावाच्या आकारात उभे केले जातात. हे सर्व सेटअप उभारणीसाठी तब्बल पाच ते सात तास लागतात. राहुल गांधींसोबत राहणारे पदयात्री एकत्र जेवतील आणि जवळ राहतील, अशी काहीशी व्यवस्था केली गेली आहे.