गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 09:42 PM2024-11-18T21:42:11+5:302024-11-18T21:45:42+5:30
Rahul Gandhi vs BJP, Maharashtra Assembly Election 2024: धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निघाल्याचाही केला दावा
Rahul Gandhi vs BJP, Maharashtra Assembly Election 2024: गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठी राहुल गांधीधारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा घणाघाती हल्ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना निघाली. त्यावेळी अदानींबरोबर अबुधाबीतील शेखशी संबंधित सेकलींक या कंपनीनेही निविदा भरली होती. रेल्वेने जमीन दिल्यानंतर या प्रकल्पाच्या अटींमध्ये बदल झाला. बदललेल्या अटींनुसार पुनर्विकासाचे काम सुरु आहे. धारावीत रहात असलेल्या प्रत्येकाला पक्के घर मिळणार आहे. धारावीतील छोट्या व मध्यम उद्योगांना २२५ चौरस फुटांचे गाळे देऊन योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Maharashtra Assembly Election 2024)
"धारावीतील गरीबांना पक्की घरे मिळू नये, त्यांनी आयुष्यभर झोपडीतच रहावे अशी राहुल गांधींची इच्छा असल्यानेच ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. अबुधाबीच्या शेख शी संबंधित असलेल्या कंपनीला या प्रकल्पाचे कंत्राट मिळाले नाही म्हणून राहुल गांधी हे या प्रकल्पाला विरोध करत आहेत का? आपल्याला राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे दस्तुरखुद्द अदानींनीच सांगितले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांत अदानींना मिळालेल्या कामांची यादीच वाचून दाखविली. राजस्थानात अशोक गेहलोत मुख्यमंत्री असताना ४६ हजार कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प, जयपूर विमानतळ, तेलंगणा मधील रेवंत रेड्डी सरकारने केलेले १२ हजार ४०० कोटींचे करार, मनमोहन सिंग सरकार केंद्रात असताना मिळालेले ६ SEZ, छत्तीसगड मध्ये बघेल मुख्यमंत्री असताना खाणींचे कंत्राट असे अनेक प्रकल्प अदानींना केंद्रात व राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असताना मिळाले आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर अदानींचा संबंध जोडून, काँग्रेस आणि अदानींमधील जुने नाते लपवू पाहत आहेत", असा खरमरीत टोला तावडेंनी लगावला.
"महाराष्ट्रातून महायुती सरकारच्या काळात एक तरी प्रकल्प बाहेर गेल्याचे राहुल गांधींनी समोरासमोर येऊन सिद्ध करावे. जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसची मानसिकता संकुचित आहे. या मागणीतून जातीजातींमध्ये समाज विभागला जावा. राहुल गांधींच्या मागणीनुसार आरक्षण दिले गेले, तर त्यात ओबीसी समाजाचे नुकसानच होईल, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा दिला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने 100 टक्के मतदान करा", असे ते म्हणाले.