Rahul Gandhi vs Ashish Shelar: "राहुल गांधींकडून महाराष्ट्र अन् मराठी माणसाचा अपमान, आता आदित्य ठाकरे गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:33 PM2022-11-18T17:33:53+5:302022-11-18T17:35:01+5:30
भाजपाच्या आशिष शेलारांचा सवाल
Rahul Gandhi vs Ashish Shelar: राहुल गांधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा (Savarkar) जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, जो कुणापुढे झुकला नाही, त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी माणासाचा अपमान आहे, असा घणाघाती आरोप भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.
"सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांचे नोकर होते हे बदनामीकारक आहे पण त्याहीपेक्षा भयंकर काँग्रेसच्या अधिकृत मासिकामध्ये काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे," असे शेलार म्हणाले.
"ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची सजा भोगली. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान काँगेस करते आहे आणि शिवसेना सत्तेसाठी माती खात आहे. बोटचेपी भूमिका घेत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला कानशिलात जोडे मारले आणि भारत जोडो अभियानामध्ये आदित्य ठाकरे झप्पी मारत आहेत. आता आदित्य ठाकरे गप्प का आहेत? आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध का करत नाहीत?" असा सवालही त्यांनी केला.
"विपर्यासाचे राजकारण शिवसेना उद्धव ठाकरे गट करत आहे. इतिहास, मराठी माणूस, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. या देशातील कोणताही देशभक्त नागरिक शिवसेना उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या अपमानाबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे," असेही त्यांनी नमूद केले.