नवी दिल्ली : मतदानाच्या दिवशी अमेठीत एका मतदान केंद्रातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राजवळ (ईव्हीएम) जाऊन ‘मतदानाच्या गोपनीयतेचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली. राहुल गांधी ईव्हीएमजवळ गेले त्यावेळी तेथे मतदान सुरू नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मतदान गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचे प्रकरण दाखल केले जाऊ शकत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘कोणतेही प्रकरण बनत नाही,’ असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. ७ मे रोजी राहुल गांधी हे ईव्हीएम लावलेल्या क्षेत्रात गेले होते. त्यांची ही कृती गुप्त मतदानाच्या नियमाचा भंग ठरत नाही काय, असा प्रश्न संपत यांना विचारण्यात आला होता.
संपत म्हणाले, आयोगाने अमेठीचे निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी आणि अन्य लोकांकडून अहवाल मागितला होता. राहुल गांधी हे सकाळी १0.३0 वाजता ईव्हीएम कक्षात गेले त्यावेळी नेमक्या त्याच ईव्हीएममध्ये बिघाड झालेला होता आणि ते यंत्र बंद पडले होते, असे या अहवालावरून स्पष्ट झाले.
राहुल गांधी हे ईव्हीएम कक्षात गेल्याचे छायाचित्र टिपणारा एका वृत्तपत्राचा छायाचित्रकार, अन्य उमेदवारांचे पोलिंग एजंट आणि मायक्रो पर्यवेक्षकांशी चर्चा केल्यानंतर त्या मतदान केंद्रावर त्यावेळी
मतदान सुरू नव्हते, हे दिसून आले. राहुल गांधी हे त्या बंद ईव्हीएमला बघायला गेले होते. त्यावेळी तेथे मतदान सुरू नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल करता येणार नाही. (वृत्तसंस्था)