स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे एक असे एकमेव स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचे प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीने होत आहे. रोज खोटे बोलायचे, रोज चुकीचे सांगायचे आणि निर्लज्जपणे वागायचे, हे जे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी करत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनताच उत्तर देईल. याच वेळी राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते. राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही -फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कारागृहात गेले नसते, तर शेकडो लोकांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक वेडे झाले असते. पण त्या सर्वांना त्या काल कोठडीतही बंड करण्याचा धीर आणि हिंमत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली. त्यामुळे मला वाटते, की हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात, त्यांना कुणी तरी लिहून देतो. त्या राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही. लिहिलेलं वाचतात. 'तीन चार साल वो रहे', अरे या वेड्यांना एवढंही माहीत नाही, की ते किती वर्ष कारावासात होते? त्यामुळे मला वाटते, की आपण यांना उत्तर द्यायला हवे आणि ते उत्तर आपण देऊ, हा विश्वास मी तुम्हाला देतो.
हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज...-आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदूत्वाचा विचार आहे, या हिंदूत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहीत होते, की हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नाही, जोवर येथील हिंदू समाज मजबूत होत नाही. कारण त्यांना इतिहास माहीत होता, की जोवर येथील हिंदू समाज मजबूत होता संघटित होता तोवर यावर आक्रमण करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. अनेक आक्रमणे परतवून लावण्याचे काम या देशाने केले.
पण, हा हिंदू समाज जेव्हा दुर्बल झाला. ज्यावेळी अपराध बोधाने हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीत आणि वर्णावर्णात हा हिंदू समाज विभागला गेला, त्यानंतरच कधी मोगलांनी, कधी इंग्रजांनी आपल्या आधिपत्याखाली ठेवले. म्हणून जरी स्वातंत्र्य मिळले तरीही, हा हिंदूसमाज मजबूत नसेल, जो या देशाचा आत्मा आहे. आत्माच नसेल, तर देश कसा राहणार? हा आत्मा जर मजबूत नसेल, तर हा देश पारतंत्र्यातच जाईल आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रीत करण्याचे कामही सावरकरांनी केले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.