ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. १६ - लोकसभा निवडणूकीदरम्यान भिवंडी तालुक्यातील सभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. शिवराज पाटील यांच्या वैयक्तिक हमीवर भिवंडी कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर केला असून याप्रकरणाची पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी संघावर आरोप केला होता. त्याची दखल घेत संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात ६ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली. त्या निमित्ताने राहुल गांधी एका तारखेस भिवंडी कोर्टात आले. त्यानंतर, दिल्ली सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या इतर याचिकांसोबत त्यांची सुनावणी झाली. मात्र, या याचिकेतील मुद्दे आणि आरोपामुळे ही याचिका पुन्हा भिवंडी कोर्टात सुनावणीसाठी पोहोचली.