Rahul Gandhi in Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज(दि.5) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांच्या हस्ते सांगलीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व ‘लोकतीर्थ’ स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेसची विचारधारा
"महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. येथील लोकांनी देशाला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खूप खोलवर रुतलेली आहेत. महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा इथे येतो, तेव्हा मला हा आमच्या विचारधारेचा गड असल्याची जाणीव होते," असे राहुल म्हणाले.
विचारधारेचे युद्ध सुरू"सध्या देशात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. देशात पूर्वी राजकारण होत होते, पण सद्यस्थितीत फक्त राजकारण नाहीये. एकीकडे काँग्रेस व सर्व महापुरुष आहेत, तर दुसरीकडे भाजप आहे. आम्हाला सोशल प्रोग्रेस हवे आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. पण सत्ताधारी पक्षाला निवडक लोकांना पुढे न्यायचे आहे. हे लोक जातव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. जातीला दुसऱ्या जातीशी लढवतात, द्वेष पसरवतात, अशी टीका राहुल गांधींनी केली.
भाजपने सर्व संस्थांत आपले लोक घुसवलेराहुल पुढे म्हणतात, "भाजपवाले देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहेत. यात काही नवी नाही. ते पूर्वीपासूनच असे करत आहेत. हीच लढाई इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली होती. तीच लढाई आज काँग्रेस लढत आहेत. याच महापुरुषांची विचारधारा पाहिली तर त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. पण भाजपच्या नेत्यांची संविधान संपवायचे आहे. त्यांनी सर्वच स्वायत्त संस्थांमध्ये आपले लोक घुसवलेत", असा आरोपही राहुल गांधी यावेळी केला.
मोदींच्या माफीनाम्यावर सडकून टीका "चुकीचे काम करणारा माणूसच माफी मागतो. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी का मागितली याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे या पुतळ्याचे काम संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट देण्याचा त्यांना पश्चाताप असावा. त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. दुसरे कारण म्हणजे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. कदाचित त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. तिसरे कारण म्हणजे, त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण तो फार काळ टिकला नाही, म्हणून त्यांनी माफी मागितली असावी", असे राहुल गांधी म्हणाले.