India Alliance Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची आज मुंबईत तिसरी बैठक झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीतील 28 विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, भारतात g20 परिषद होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. पण, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातांमध्ये एक बातमी छापून आली आहे. त्यात एक अब्ज डॉलर्स भारताबाहेर गेले आणि वेगळ्या मार्गाने परत भारतात आल्याचे बोलले जात आहे. ही भारताच्या सन्मानाची बाब आहे. नरेंद्र मोदींनी यावर बोलायला हवं.
भाजप निवडणूक जिंकू शकत नाहीराहुल पुढे म्हणाले, इथे उपस्थित मंचावरील नेते आणि त्यांचे पक्ष भारतातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपला आगामी निवडणूक जिंकता येणार नाही. I.N.D.I.A आघाडी निवडणुकीत भाजपला सहज पराभूत करेल. भाजप देशातील गरिबांचा पैसा हिसकावून दोन-तीन निवडक लोकांना देत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. I.N.D.I.A आघाडीमधील जागावाटपाबाबत राहुल गांधी म्हणाले की, यावर सर्वजण चर्चा करून ठराव काढू.