मुंबई - देशातील नव्हे तर कौटुंबिक लोकशाही धोक्यात आली आहे. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस राजकारण करू शकत नाही. इतके वर्ष अध्यक्ष होते. ते आम्हाला लोकशाही काय सांगतात. राहुल गांधी कधीही मोदींना चॅलेंज करू शकत नाहीत. २०२४ हा देशाचा टर्निंग पाँईट आहे. तिथे देशाची संपूर्ण जनता सगळे हेवेदावे बाजूला ठेऊन मोदींना मतदान करतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले. भाजपा आले तर मुस्लिमांना पाकिस्तानात जावे लागेल, बाबासाहेबांची घटना बदलून टाकतील अशी दिशाभूल करून काँग्रेस मतदान मागते. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जातो. राहुल गांधी नरेंद्र मोदींशी तुलना होऊ शकत नाही. काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ताही मोदी हवा असं म्हणतो. देशाला मोदींची गरज आहे. जगात सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदींनी केला. त्यादिशेने पाऊले उचलली जात आहे. २०२४ च्या निवडणुकीतही मोदी हवेत असे काँग्रेसचा बुथवरचा कार्यकर्ता म्हणतो. राहुल गांधी आणि कुटुंबाने कुठले असे काम केलंय ज्याने ते मोदींशी मुकाबला करू शकतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अदानींचा आणि सरकारचा काय संबंध?अदानी हे व्यावसायिक आहेत. ते व्यवसाय करतायेत. सरकारचा त्यांच्याशी संबंध नाही. सरकारचा त्यात थेट संबंध नाही. अदानी गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा नरेंद्र मोदींशी संबंध जोडणे हे चुकीचे आहे. अंबानी, टाटा अनेकजण मोठे झालेत. उद्योगपतींशी सरकारचा संबंध काय? त्यांनी कर्ज घेतले, पैसे घेतले, व्यवसाय केला. जर उद्या बँकांना काही अडचणी आल्या तर सरकारचा संबंध येतो. हे केवळ राजकारणासाठी जोडले जातय असा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पाहा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत
राहुल गांधी स्टंटबाजकाँग्रेसनं जे काही समज पसरवले त्याला अर्थ नाही. खासदारकी गेल्यावर बंगला सोडावा लागतो. पदावरून गेल्यानंतर बंगला खाली करण्याची नोटीस देण्याची वेळ येऊ नये. मनमोहन सिंग यांनी आणलेले विधेयक राहुल गांधींनीच फाडले होते. नवीन कायद्याने सदस्यपद रद्द झाले का? खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. नियम हा सर्वांनाच सारखा आहे. कोर्टाने शिक्षा दिली मग वरच्या कोर्टात का गेले नाहीत? तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला नाही तर वरच्या कोर्टात जायला हवं होते. कोर्टाच्या निकालावर स्टे मिळवला नाही तर खासदारकी जाईल हे माहिती नव्हते का? कोर्टात माफी मागितली असती तर काय बिघडले असते? ही काँग्रेसची स्टंटबाजी आहे. तुम्हाला हिरो बनायचे होते म्हणून राहुल गांधींनी खासदारकी गमावली. राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.