"राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:22 PM2022-11-17T20:22:25+5:302022-11-17T20:22:56+5:30
तुम्ही रक्ताने, नात्याने बाळासाहेबांचे वारसदार असाल पण विचारांनी नाही. बोलताना सांभाळून बोलावं असं रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना बजावलं.
मुंबई - शिवसेनाप्रमुखांच्या नावावर बाजार कुणी मांडला याचं आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी केले पाहिजे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना ५७ टक्के तर शिवसेना आमदारांना १६ टक्के निधी असायचा. शिवसेना आमदारांवर प्रचंड अन्याय होत असतानाही पक्ष फुटला तरी चालेल राष्ट्रवादीला सोडायला तयार नाही. आमदार गेले तरी चालतील पण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडायला तयार नाहीत अशी टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
रामदास कदम म्हणाले की, मुलगा म्हणून बाजार कुणी मांडला याचं आत्मपरिक्षण केले पाहिजे. डीएनए आमचा काय तपासता? शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं होतं की, ज्यादिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करून टाकेन. मग आता आदित्य ठाकरेंनी थेट काँग्रेसच्या राहुल गांधींना जाऊन मिठीच मारली ना, मग डीएनए कुणाचा चेक करणार? याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्ही रक्ताने, नात्याने बाळासाहेबांचे वारसदार असाल पण विचारांनी नाही. बोलताना सांभाळून बोलावं. आम्हालाही बोलता येते. आम्ही पक्षात आयुष्य घालवलं. शेकडो केसेस घेतल्या. ५२ वर्ष पक्षाला दिली. काल आलेली बाई तिच्याकडून आम्ही पक्षाची निष्ठा शिकायची का? तो विषय जाऊ द्या असं सांगत रामदास कदमांनी सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला.
आपल्या आयुष्यातील २४-२५ वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेलमध्ये टाकली. राहुल गांधी तुमचं योगदान काय? मनीशंकर अय्यर सावरकरांवर बोलले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख स्वत: जोड्याने त्यांच्या फोटोला मारलं होते. आणि त्याच राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग डीएनए कुणाचा तपासावा? स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार आहे. राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. स्वातंत्र्यवीराचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणीही रामदास कदम यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"