राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असून, नेतेमंडळी आव्हान-प्रतिआव्हान देतानाही दिसत आहेत. यातच, भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी मुस्लीमआरक्षणाच्या मुद्यावरून राहुल गांधींवर थेट निशाणा साधला आहे. "राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी जरी आली तरीही मुस्लीमआरक्षण देऊ शकणार नाही," असे शाह यांनी म्हटले आहे. ते धुळ्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
काय म्हणाले अमित शाह? -शाह म्हणाले, "काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना हे सर्व उलेमा भेटले आणि म्हणाले, मुस्लिमाना आरक्षण द्यायला हवे. बंधू-भगिनींनो, जर मुसलमानांना आरक्षण द्यायचे असेल तर, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणातून कापून द्यावे लागेल." यावेळी, धुळे करांनो आपण मुस्लीम आरक्षणासाठी सहमत आहात का? असा प्रश्न शाह यांनी जनतेला केला. यावर जनतेतून आवाज आला 'नाही...'. यावर, शाह म्हणाले, "राहुल गांधी, आज मी धुळ्यातून सांगून जात आहे, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी जरी आली तरीही मुस्लीम आरक्षण देऊ शकणार नाही."
शाह म्हणाले, "बंधू-भगिनींनो, यांनी संपूर्ण आयुष्यभर तुष्टीकरणाचे काम केले आहे. मी आज आपल्याला विचारण्यासाठी आलो आहे की, काश्मीर आपले आहे की नाही? यावर जननेतेतून आवाज आला 'आहे...'. यावर शाह यांनी पुन्हा प्रश्न केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवले योग्य केले की नाही? यावर पुन्हा जनतेतून आवाज आला 'योग्य केले...'"
इंदिरा गांधी स्वतः जरी स्वर्गातून परत आल्या, तरी कलम 370 परत येणार नाही -शाह पुढे म्हणाले, "आता हे राहुल गांधी म्हणतात, आम्ही काश्मिरात कलम 370 परत आणू, असा त्यांनी प्रस्ताव केला आहे. राहुल गांधी, आपण तर सोडाच, पण इंदिरा गांधी स्वतः जरी स्वर्गातून परत आल्या, तरी कलम 370 परत येणार नाही. काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. ते आमच्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही."