मुंबई- विरोधकांच्या INDIA आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील कथिक संबंधांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी परदेशी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांचा दाखलाही दिला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, G-20 परिषद देशासाठी महत्त्वाची आहे, मात्र देशात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. गौतम अदानीबाबत आज काही खुलासे झाले आहेत, त्यामुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. देशाबाहेर पैसा पाठवला जातोय, हा पैसा नेमका कोणाचा आहे? काही वृत्तपत्रांनी अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत. वृत्तपत्र दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हा पैसा कोणाचा, अदानींचा की दुसऱ्याचा?
गांधी पुढे म्हणाले, आम्हाला जगाला सांगायचय की, आमची अर्थव्यवस्था पारदर्शक आहे. आमच्याकडे सर्वांना समान संधी आहे. मग पंतप्रधान मोदींनी असे का करावे? पंतप्रधान जेपीसीची मागणी का मान्य करत नाहीत, तपास का टाळत आहेत? पंतप्रधानांच्या जवळ असलेल्या अदानींना आपल्या अर्थव्यवस्थेत फायदे का दिले जात आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अदानीच्या नेटवर्कद्वारे 1 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले आणि नंतर तेच परत आले. यातूनच त्यांनी देशात स्वत:ची वाढ केली. आता त्यांना धारावीचा प्रकल्पही मिळाला आहे. हा कोणाचा पैसा गुंतवला जातोय? अदानींच्या भावासह दोन परदेशी आपल्या शेअर बाजारावर कसा प्रभाव टाकत आहेत? यावेळी त्यांनी दोन परदेशी व्यक्तींचे नावेही सांगितली. तसेच, अदानी कुटुंबाने आपल्या शेअरमध्ये स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याचा आरोप यावेळी त्यांनी लावला.
ते पुढे म्हणाले, सेबीने या प्रकरणात तपास केला, ज्यांनी क्लिनचीट दिली, ते अदानींच्या चॅनलचे डिरेक्टर आहेत. याचाच अर्थ हे एक नेटवर्क आहे. सेबीचा चेअरमन क्लीनचीट देतो आणि नंतर अदानी यांच्या कंपनीत डायरेक्टर बनतो. या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का करत नाहीत? नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे चांगले संबंध आहेत, अशी माहिती वृत्तपत्रातून येते. मोदींनी याविषयी माहिती द्यावी. ईडी अदानींवर रिसर्च का करत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.