मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आहेत. यात त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकरांनी इंग्रजांनी माफी मागितली, पेंशन घेतली आणि काँग्रेसविरोधात काम केले, असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर सावरकरांचे पणतू रणजीत सावकर यांनी राहुल गांधींच्या अटकेची मागणी केली.
आज रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना ते म्हणाले की, 'सावरकर बॅरिस्टर होते, त्यांना पैसे कमवायचे असते, तर त्यांनी लाखो रुपये कमवले असते. पण, चांगल्या आयुष्याचा त्याग करुन त्यांनी देशासाठी कष्ट भोगले. 13 वर्षे स्थानबद्धता आणि 14 वर्षे कारावास भोगलेले एकमेवर राजनेते होते. ते ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते, असा त्यांचा अपमान केला जातो. राहुल गांधींनी आरोप करण्याचे जे पाप केले आहे, त्याविरोधात मी पोलिसांकडे राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.
संबंधित बातमी- "आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र
ते पुढे म्हणाले की, 'इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये सावरकर मोस्ट डेंजरस मॅन असा उल्लेख आहे. त्यांनी जे पत्र दाखवले, त्यांचा तो मूर्खपणाचा कळस आहे. या माणसाला पत्रात कोणता शब्द वापरतात, ते कळत नाही. पत्र लिहीण्याची पद्धत असते, मोस्ट ओबिडीयंट सर्वंटचा, मी तुमचा नोकर बनू इच्छितो, असे भाषांतर त्यांनी केले. त्याच काळात महात्मा गांधींचीही अशीच पत्रे आहेत. त्या काळात ही पत्र लिहिण्याची पद्धत होते. ही शिष्टाचाराची पद्धत होती, या मूर्खाला ते काय कळणार. भारतीयांनी अशा मूर्खांपासून लांब राहावे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात की, 'पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करावा. राहुल गांधींनी सावरकरांना देशद्रोही म्हटले होते, त्याविरोधात तक्रार केली होती. तेव्हा भोईवाडा कोर्टातने तपास करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. आता मी त्याची प्रत मिळवली आहे. ही भारत तोडो यात्रा असेल, तर ती बंद करण्याची मागणी प्रत्येक राष्ट्रभक्ताने करावी. राहुल शेवाळे यांनी ती मागणी केलीये, ती योग्य आहे. हे सरकार न्यायाप्रमाणे वागेल, असा मला विश्वास आहे,' असंही ते म्हणाले.