राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:12 AM2024-09-20T05:12:00+5:302024-09-20T05:12:46+5:30
राहुल यांना भाजप घाबरला असून त्याच्या मित्र पक्षांचे नेते सातत्याने राहुल यांना जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत, असे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.
मुंबई : सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्याने राहुल गांधींना दिलेल्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते आहेत. राहुल यांना भाजप घाबरला असून त्याच्या मित्र पक्षांचे नेते सातत्याने राहुल यांना जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत, असे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर येथे पार पडली. या बैठकीला चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, विधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत मविआ सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वास चेन्निथला यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल गांधी हे संयमी नेते आहेत, पण भाजप त्यांच्या जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईट का जवाब पत्थर से देंगे.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातेवाईक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल.
- बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते