राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 18:30 IST2018-12-17T18:26:28+5:302018-12-17T18:30:06+5:30
राफेलवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून भाजपतर्फे देशभर सत्तर पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे.

राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन
पुणे : राफेल कराराबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करत असलेले आरोप खोटे आहेत. हे आरोप ज्या खोट्या माहितीच्या संदर्भात केले जात आहेत त्या माहितीचा खबरी त्यांनी जाहीर करावा असे आव्हान खासदार पूनम महाजन यांनी दिले आहे. राफेलवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून भाजपतर्फे देशभर सत्तर पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. याचाच भाग म्ह्णून महाजन यांनी पुण्यात विचार मांडले. यावेळी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की, बोफोर्स घोटाळ्याचा कलंक धुवून काढण्यासाठी राहुल गांधी सरकारवर आरोप करत आहेत. काँग्रेसच्या राफेलबाबच्या तक्रारी असतील त्याबद्दल संसदेत चर्चा करावी. परंतु संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत असल्याचेही महाजन म्हणाल्या.चौकीवर ही चोर हैं’ म्हणत काँग्रेसकडून राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्याला उत्तर म्हणून महाजन यांनी पत्रकार परिषदेत भाजपतर्फे युक्तिवाद केला.