लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून राजकीय प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. अशातच सोलापूरमधील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
याचबरोबर, निवडणुकीत पराभवाच्या भीतीने राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.
सोलापूरमधील सभेत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 90 टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा 25 उद्योगपतींना दिलाय. देशातील जनतेने आता मोदींना ओळखले आहे. त्यामुळेच मोदी घाबरलेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटतेय आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हे पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोलापूर येथील जाहीर सभेतून केली.